द अकॅसिडेंटल प्राईम मिनिस्टर — सत्तेच्या केंद्रातला शांत माणूस
राजकारणावर लिहिलेली पुस्तकं आपण अनेकदा वाचतो. काही पुस्तकं माहिती देतात, काही पुस्तकं भूमिका घेतात, तर काही पुस्तकं पडद्यामागचं वास्तव दाखवतात. पण हे पुस्तक वाचताना सतत एक वेगळीच भावना मनात राहते — देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेला माणूस इतका शांत, इतका अभ्यासू आणि तरीही इतका असहाय्य असू शकतो का?
सर्वात आधी संजय बारू यांचं कौतुक करावंसं वाटतं. कारण भारताच्या राजकारणातील अत्यंत संवेदनशील काळावर लिहिणं हे तसं सोपं काम नाही. विशेषतः असा काळ ज्यामध्ये सत्ता एका व्यक्तीकडे दिसत होती पण निर्णय कुठेतरी दुसरीकडे घेतले जात होते. हे लिहिताना लेखकाने कुठेही अति नाट्य निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे पुस्तक अधिक वास्तववादी वाटतं.
डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल आपल्याकडे एक ठरलेली प्रतिमा आहे — प्रामाणिक, विद्वान, संयमी आणि कमी बोलणारा पंतप्रधान. पण या पुस्तकातून त्या प्रतिमेमागचा माणूस उलगडत जातो. देशासाठी प्रचंड क्षमता असलेला पण राजकीय समीकरणांमध्ये सतत मर्यादित राहिलेला नेता म्हणून मनमोहन सिंग समोर येतात. काही ठिकाणी त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते, तर काही ठिकाणी प्रश्नही पडतात की इतकी बुद्धिमत्ता असूनही त्यांनी स्वतःचं राजकीय अस्तित्व अधिक ठाम का केलं नाही?
पुस्तकातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्तेचं वास्तव. बाहेरून दिसणारी दिल्ली आणि प्रत्यक्षात चालणारी दिल्ली यात किती मोठा फरक असतो हे पुस्तक सतत दाखवत राहतं. पंतप्रधान कार्यालय, काँग्रेस पक्ष, सत्ताकेंद्र, माध्यमं, आघाडीचं राजकारण — हे सगळं इतक्या सहजपणे पुस्तकात येतं की आपण एखाद्या राजकीय कादंबरीत फिरतोय असं वाटतं. पण ही कादंबरी नाही, ही वस्तुस्थिती आहे हे जाणवलं की पुस्तक अधिक अस्वस्थ करतं.
मला वैयक्तिकरित्या पुस्तकात सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे मनमोहन सिंग यांचा स्वभाव.त्या काळात या व्यक्ती ने शांतपणे अर्थकारण, परराष्ट्र धोरण आणि देशाची स्थिरता सांभाळल. त्याचं यश कदाचित त्याने कधीच स्वतः सांगितलं नाही आणि म्हणूनच ते अनेकदा झाकोळलं गेलं.
अर्थात पुस्तक पूर्णपणे एकतर्फी नाही आणि पूर्णपणे निष्पक्षही नाही. कारण लेखक स्वतः त्या व्यवस्थेचा भाग होता. त्यामुळे काही ठिकाणी त्यांची भूमिका जाणवते. काही प्रसंगांमध्ये त्यांनी मनमोहन सिंग यांच्याबद्दलचा आदर जरा जास्तच जपला आहे असंही वाटतं. पण तरीही पुस्तकाचं महत्त्व कमी होत नाही. उलट आतून पाहिलेल्या सत्तेच्या रचनेचं हे महत्त्वाचं दस्तऐवजीकरण वाटतं.
पुस्तक वाचताना सतत एक प्रश्न मनात राहतो — भारतात खरंच सत्ता कोण चालवत होतं? निवडून आलेला पंतप्रधान की त्यामागची राजकीय व्यवस्था? आणि कदाचित हाच प्रश्न या पुस्तकाला फक्त एका व्यक्तीची गोष्ट न ठेवता भारतीय लोकशाहीच्या संरचनेवर भाष्य करणारं पुस्तक बनवतो.
भाषा अत्यंत सोपी आहे. कुठेही अनावश्यक बौद्धिक आव आणलेला नाही. त्यामुळे राजकारणात फार रस नसणारा वाचकही पुस्तकात गुंतून राहतो. विशेष म्हणजे पुस्तकातली शांतता हीच त्याची ताकद आहे. कुठेही ओरड नाही, सनसनाटी नाही; पण तरीही प्रत्येक प्रकरणानंतर मनात विचारांचं वादळ निर्माण होत राहतं.
एकंदरीत, हे फक्त एका पंतप्रधानाचं चरित्र नाही. हे सत्तेच्या मर्यादा, प्रामाणिकपणाची किंमत आणि भारतीय राजकारणाच्या गुंतागुंतीवर भाष्य करणारं पुस्तक आहे. काही पुस्तकं माहिती देतात, काही पुस्तकं मत बदलतात, आणि काही पुस्तकं विचार करायला भाग पाडतात. हे पुस्तक तिसऱ्या प्रकारातलं आहे.
राजकारण समजून घ्यायचं असेल, सत्तेच्या पडद्यामागे डोकवायचं असेल आणि मनमोहन सिंग नावाच्या व्यक्तिमत्त्वाकडे नव्याने पाहायचं असेल तर हे पुस्तक आवर्जून वाचावं असंच आहे.

Comments
Post a Comment